भारत न्यूज 1 प्रतिनिधि मंगलवेढ्या
मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यात आंदोलन करण्यात येत आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. तर, आजपासून मंगळवेढा शहर आणि तालुक्यात अतिशय शांततेत आठवडाभर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
आज मंगळवारी सकाळी 11 वाजता दामाजी चौकात रास्ता रोको व साखळी आंदोलन करण्यात आले आहे.
बुधवार दि.13 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय, बँक, खाजगी संस्था, एस टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.गुरुवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा दामाजी चौक पासून सुरुवात होऊन शिवजयंती मिरवणूक मार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी अर्धनग्न व मुंडण आंदोलन दामाजी चौकात सकाळी 10 वाजता होणार आहे.शनिवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात रक्तरंजीत सह्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दामाजी चौकात चक्काजाम व अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत होते. दरम्यान, पोलिसांकडून यावेळी लाठीमार करण्यात आला होता. ज्यात अनेक गावकरी जखमी झाले होते.तर काही पोलीस देखील गंभीर जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, पोलिसांनीच लाठीमार करून जखमी केले असून, गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी देखील हे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी आंदोलनालात हिंसक घटना सुद्धा समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.