भारत न्यूज 1 नाशिक
महाराष्ट्रातील सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन, शहीद सैनिक कुटुंबीयांना मदत याकामी नाशिक महानगरपालिकेने जिल्ह्यातून सर्वात जास्त (दहा लक्ष आठ हजार रुपये) सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी-2022 संकलित केल्याबद्दल गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक महानगर पालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रशंसा केली. तसेच शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रशस्ती पत्रक व पारितोषिक देऊन गौरव केला.
या निमित्ताने प्रमाण पत्र देऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने लेखा विभागाचे उपलेखापाल रमेश उदावंत व सूर्यभान खोडे यांनी हे प्रमाण पत्र स्वीकारले. २०२३-२४च्या ध्वज निधी संकलनाची सुरुवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली. सदरचा कार्यक्रम नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे संपन्न झाला.
या निधी संकलनात मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुरेख जाधव उपलेखा अधिकारी गुलाब गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगर पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचा मोठा सहभाग असल्याने मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केले. सत्काराच्या वेळी उपआयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे,नितीन नेर, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, लेखा विभागातील उपलेखापाल रमेश उदावंत, लेखापाल दत्तात्रय पुंड,अजय कमोद आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.