भारत न्यूज 1 मुंबई संपादक देवराज सोनी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ७०१ कि.मी लांबीपैकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समुद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्यानुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या Blinking Light Bar (Red -White -Blue) with PA system, Vehicle Graphics Design, First Aid kit, Fire Extinguisher या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, अनिलकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
७०१ कि.मी लांबीपैकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समुद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता (६०० कि.मी) वाहतुकीस खुला आहे. आतापर्यंत अंदाजे ५७ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महामार्गावरील घटनांबाबत सेंट्रल कंट्रोल रुम स्थापित केले असून त्याद्वारे शीघ्र प्रतिसाद वाहने, १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची / इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत.याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन ( Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर ( SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे Incident Management Responder मार्फत कामकाज पाहिले जाते.
याव्यतिरिक्त रहदारी व घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम ( ITS) महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचे लक्ष वेधण्यासाठी प्रति २५ कि.मी वर रम्बर्लस स्ट्रीप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे व विविध शिल्प उभारण्यात आले आहेत. तसेच पथकर नाक्यावर वेग मोजण्याचे भोंगे ( Hooters) लावण्यात आले असून त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणारी वाहने ओळखून त्या चालकाचे प्रादेशिक परिवहन (RTO) विभागामार्फत समुपदेशन केले जाते. महामार्गावर बहुतांश ठिकाणी महामार्गावर दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये – जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने – २१, रुग्णवाहिका – २१, ई.पी.सी गस्त वाहने – १४, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे- १३, ३० टन क्षमतेची क्रेन – १३, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत – १४२ सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.