भारत न्यूज 1 मुंबई संपादक देवराज सोनी
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याच्या चार खंडांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन*
—-
*शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान- राज्यपाल रमेश बैस*
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी सुरू करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र अव्वल राहिला आहे. या अभियानाच भाग म्हणून महाराष्ट्रात ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ¬‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, गिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ ॲड्ज्युरिकेटर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहित करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत देश एक विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल यांनी युवकांना केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक प्रकाशन झाले याचा आनंद आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात, नाटक, कथा, कादंबरी, लोककथा, प्रवासवर्णन आदी लेखन केले. त्यांच्या साहित्याचे भारतीय आणि विदेशी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहे. त्यांचे साहित्य पुनर्मुद्रीत करून ई-बुक तयार केल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे अभिनंदन केले.
सर्वांनी लोकशाहीरांचे साहित्य वाचण्याचे आणि देशातील लोकांची सेवा करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या कवितांच्या ओळींचे स्मरण करून त्यांनी देश हा दगडांचा नसून आपण त्यांना भारत माता मानतो, सर्वांनीही तशाच भावना ठेवाव्यात, असेही राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी सांगितले.
*‘सेल्फी विथ, मेरी माटी’ अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही महाराष्ट्राला दिवाळी भेट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
विक्रम वीरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियान देशभरात राबविण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सेल्फी विथ मेरी माटी अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली भेट आहे. देशभावनेचे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सुरुवातीपासून आघाडीवर होता. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जी 20 चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची बाब आहे.
*चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
भारत हा केवळ भूभाग नाही तर तो जीवंत राष्ट्रपुरुष आहे. भारत माता असे आपल्या मातेचे स्थान आपल्या देशाला दिले आहे. ज्याप्रमाणे मातेचे उत्तरदायी होता येत नाही तसे मातीचे सुद्धा उत्तरदायी होता येत नाही आणि ऋण ही फेडता येत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या अभियानातून देशात मातीची मोठ्या प्रमाणावर पूजा केली आणि मेरी माटी मेरा देश या अभियानासोबत सर्वजण सहभागी झाले. या मातीने आपल्याला स्वातंत्र्यसेनानी दिले. या देशाबद्दल प्रेम भावना अभिव्यक्त होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आपल्या मातीबदल देशभावनेचे अभियान राबविण्यात आले आणि चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
*अभियानात सहभागीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील*
मी वीस वर्षाचा असताना देशात काश्मीर प्रश्नासारखे अनेक प्रश्न होते. देश वाचविण्याचा आणि देशासाठी जगण्याचा विचार मनात होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे अनेक प्रश्न सोडविले. देशातल्या तरुणाईच्या मनात देशभक्ती जागृत केली. तरुणाईच्या मनातून देशभक्ती कधीही कमी होणार नाही. आज 25 लाख विद्यार्थ्यांनी मेरी माटी मेरा देश अंतर्गत सेल्फी विथ मेरी माटी या अभियानात सहभाग घेतला. हे देशभक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरो को वंदन’ हे अभियान जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियान राबविले. या अभियानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे अशी माहिती राजेश पांडे यांनी सांगितले.