Search
Close this search box.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्गाचे उद्घाटन

भारत न्यूज 1 नागपूर

*विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

 

संसदीय कार्य प्रणालीत महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून अनेक क्रांतिकारी कायदे या विधिमंडळात झाले आहेत. सदस्यांसह राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि राजकीय विचारवंत, तज्ञ, माध्यमे, सर्वसामान्य जनतेसाठी विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर आहे, त्यामुळे विधिमंडळ आणि प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढविण्यासाठी या अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नागपूर विधानभवनात आज राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार ॲड्. आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले यांचेसह राज्यातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी, अधिव्याख्याता उपस्थित होते.

संसदीय कार्य प्रणालीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा संसदीय अभ्यासवर्गाचा उद्देश आहे. विधानमंडळाला गौरवशाली परंपरा आहे. त्यामध्ये एक ऊर्जा आणि प्रेरणा आहे. विधानमंडळ म्हणजे जनतेसाठी एक ऊर्जा आहे. अनेक प्रश्नांवर येथे चर्चा होत असते. ती पाहण्याची व कशाप्रकारे प्रश्न सोडवले जातात हे समजून घेण्याची संधी या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विधानमंडळाच्या माध्यमातून होत असतो. लोकांना त्यांच्या घरी जाऊन योजनांचा लाभ देणारी ‘शासन आपल्या दारी’ ही योजना आपण सुरू केली आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे ही शासनाची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. देशाला एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन लोककल्याणकारी अनेक योजना राबवत असते. या योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी चांगले काही करण्याची भावना असली पाहिजे. समर्पित भावनेने काम केले पाहिजे. या अभ्यासवर्गामध्ये विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, कायदे कसे निर्माण होतात हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम आपल्यासर्वांकडून व्हावे हाच या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

*सामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याची विधिमंडळात क्षमता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला समृध्द लोकशाही दिली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संधीची समानता शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी सभागृह काम करत असते. लोकशाहीचे ज्ञान, सखोल माहिती लोकांपर्यंत पोहचावी, त्याचा अभ्यास व्हावा, प्रक्रिया समजावी व त्याची प्रगल्भता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभ्यास वर्ग महत्वाचा आहे. राज्य घटनेने विधान मंडळांना दिलेल्या अधिकारानुसार विधानमंडळाचे कामकाज होते. या अधिकारानुसार सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम होत असून विधानमंडळ हे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविकात संसदीय अभ्यासवर्गाची परंपरा, महत्त्व आणि इतिहास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार अँड्. शेलार यांनी केले.यंदाच्या अभ्यास वर्गामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधील राज्यशास्त्र व लोक प्रशासन विषयातील ८१ विद्यार्थी व १२ अधिव्याख्याता सहभागी झाले आहेत.

 

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More