भारत न्यूज 1 प्रतिनिधी परभणी
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शुक्रवारी मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी परभणी शहरात जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवकांच्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मोर्चेकऱ्यांनी अडविण्यात आले. त्याठिकाणी जावून उपविभागीय महसूल अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत युवकांनी स्टेशन रोडवरून दुकाने बंद केली.
दरम्यान, शुक्रवारी रात्री परभणी शहरात एक एसटी बस व एका खाजगी ट्रॅव्हल्सवर अशा दोन वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून यात दोन्ही बसचे नुकसान झाले. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बहुतांश दुकाने शनिवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास जमावाने उर्वरित दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात मानवत व सोनपेठ येथेही बंद पुकारण्यात आला असून व्यापारपेठा कडकडीत बंद आहेत.